दापोली - मंडणगड दौरा
निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, घरांचंही फार मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे अनेकांचं स्थलांतर करावं लागेल अशी स्थिती आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना चांगल्या प्रकारची घरं कशी देता येतील याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला विचार करावा लागेल असं कोकण दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी म्हटलं आहे. रायगड नंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पवार यांनी पाहणी केली, लोकांशी संवाद साधला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे या परिस्थितीत या व्यक्तीला उभं करण्यासाठी अधिक अर्थसाहाय्यची गरज आहे. त्यासाठी निकष बदलणं आवश्यक आहे.
कोकणातील नुकसानीची सर्व स्थिती उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. आजच आपल्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आणि उद्या तातडीने या नुकसानीबाबतच्या बैठकीसाठी मुंबईला बोलावलं असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. कोकणवासीयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस भूमिका आम्ही सर्व जण त्या ठिकाणी घेणार आहोत, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर येणार आहेत, याबद्दल पवार यांना विचारलं असता, त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला, फडणवीस दौऱ्यावर येताहेत हे चांगलं आहे, सर्वाना कळलं पाहिजे किती नुकसान झालं आहे ते, प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातून येतो, मी दुष्काळी भागातून येतो, ते नागपुरातुन येतील, समुद्राचा नागपूरचा काही संबंध नाही. पण त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडते, आमच्याही होते, त्यांच्याही होते. तेव्हा ते येताहेत ही चांगली गोष्ट आहे.